Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागले आहे.
खरेतर, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांच्या रकमेत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय होणार असा देखील दावा केला जात होता. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पीएम किसान योजनेबाबत कोणतीच घोषणा केली नाही.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पुरुष शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून आता 6,000 रुपयांऐवजी 8,000 आणि महिला शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 12 हजार रुपये दिले जाऊ शकतात असा दावा गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
दरम्यान, या योजनेबाबत केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्जुन मुंडा यांनी म्हटल्याप्रमाणे, पीएम किसान योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 8 हजार रुपये आणि महिला शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 12 हजार रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या स्थितीला केंद्रातील मोदी सरकार दरबारी विचाराधीन नाहीये.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्यांना आता फुल स्टॉप लागेल अशी आशा आहे. दुसरीकडे या योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत.
विशेष म्हणजे सोळावा हप्ता हा मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यात होळीचा सण देखील येणार आहे.
यामुळे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जर केंद्र शासनाने या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि सणासुदीच्या दिवसात या पैशांचा काहीतरी उपयोग होईल असे मत आता व्यक्त होऊ लागले आहे.
तथापि, याबाबत केंद्र शासनाने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.