Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरु आहे. या अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. पण, हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हफ्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. आता शेतकरी बांधव पुढील सतराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
खरे तर मागील सोळावा हफ्ता हा यवतमाळ येथील शेतकरी कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ऐन दुष्काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या मागील हफ्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा देखील दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला आहे. पण आता पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच 17 वा हप्ता हा काही निवडक शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. पण काही शेतकऱ्यांची पुढील 17 व्या हप्त्याची दोन हजार रुपयांची रक्कम अटकू शकते असा दावा होत आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही 17वा हफ्ता
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना याचा 17वा हप्ता मिळणार नाही. त्यांचे पैसे अडकू शकतो. त्यामुळे हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी सुद्धा करून घेणे आवश्यक आहे, जे लाभार्थी हे काम करणार नाहीत त्यांना हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.
PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळविण्यासाठी, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे देखील आवश्यक आहे. ज्यांनी हे काम केलेले नसेल त्यांना 17 वा हप्ता मिळणार नाही.
जर शेतकऱ्याने दिलेली बँक खात्याची माहिती चुकीची असेल, अर्जात नाव, लिंग किंवा दिलेला आधार क्रमांक चुकीचा असेल, तर अशा परिस्थितीतही पुढील हफ्ता अडकणार आहे.
यामुळे योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वर सांगितलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करून घेणे आवश्यक राहणार आहे. जे शेतकरी बांधव ही कामे करणार नाहीत त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.