Pm Kisan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. देशातील अनेक लोक शेती व शेती पूरक व्यवसायांवर आधारित आहेत.
देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. यामुळे आपल्या देशाला शेतीप्रधान देशाचा तमगा मिळाला आहे. साहजिकच, कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महात्वाकांक्षी योजनेत समाविष्ट आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ पुरवला जात आहे. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते मिळाले आहेत आणि शेतकरी बांधव या योजनेच्या पुढील पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान पंधराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषी विभागाने पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, PM Kisan चा 15वा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. केंद्रीय कृषी विभागाने ही माहिती आपल्या ट्विटरच्या अधिकृत हँडलवरून दिली आहे.
या योजनेचा पंधरावा हफ्ता 15 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. या योजनेचा हप्ता हा देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अर्थातच देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड होईल हेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे. तथापि शेतकरी बांधवांनी या योजनेचा हप्ता दिवाळीच्या पूर्वीच मिळायला पाहिजे होता असे मत व्यक्त केले आहे. मात्र या योजनेचा हप्ता भाऊबीजच्या दिवशी जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच यामुळे दिलासा मिळणार आहे.