Pm Kisan Yojana : कृषीप्रधान देश म्हणून ओळख प्राप्त असलेल्या आपल्या भारतात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. गेल्या दोन पंचवार्षिक पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
यात शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत केली जात आहे. हे पैसे मात्र शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण 16 हप्ते देण्यात आले आहेत. म्हणजे या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण 32 हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे.
या योजनेचा मागील सोळावा हप्ता हा गेल्या महिन्यात अर्थातच 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे.
अशातच मात्र पीएम किसान योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.
या शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली होणार
पीएम किसान योजना ही केंद्रीय शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेचे काही नियम आहेत. या योजनेचा लाभ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो.
यामुळे जर कुटुंबातील एकापेक्षा अधिक शेतकरी याचा लाभ घेत असतील तर अशा कुटुंबातील एका व्यक्तीकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.
याशिवाय जे शेतकरी आयकर भरत असतील आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून देखील या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत. तसेच जे शासकीय कर्मचारी असतील त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर एखाद्या शासकीय कर्मचारी असलेल्या कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा व्यक्तीकडूनही या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांना सरकारी पेन्शन मिळत असेल आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडूनही या योजनेचे पैसे वसूल होणार आहेत.