Pm Kisan Yojana Rule : पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली एक प्रमुख केंद्रीय पुरस्कृत शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतात त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. पण हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एक रकमीं दिले जात नाही.
म्हणजेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पैसे दिले जातात. दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता वितरित केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते मिळाले आहेत. मागील 14वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांना जुलै महिन्यात मिळाला होता.
27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात आला. या योजनेअंतर्गत पैसे थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणाली अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो.
यामुळे या योजनेचा लाभ एकाच वेळी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळतो. हेच कारण आहे की, ही योजना गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे. या योजनेला आता जवळपास चार वर्ष झाले आहेत. मात्र तरीही या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न पाहायला मिळतात.
या योजनेच्या लाभाबाबत शेतकऱ्यांना अजूनही परिपूर्ण माहिती नाहीये. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांकडून अनेकदा या योजनेचा लाभ शेतकरी पिता आणि पुत्र या दोघांना मिळू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकरी पिता आणि पुत्र दोघांना मिळणार का पंधराव्या हफ्त्याचा लाभ
जर तुम्हीही पीएम किसानचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता शेतकरी पिता आणि पुत्र दोघांनाही मिळू शकतो का? असा जर तुमचा प्रश्न असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण की आज आपण याबाबत पीएम किसान योजनेचे काय नियम आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
पीएम किसान योजनेच्या नियमाप्रमाणे या योजनेचा लाभ हा कुटुंबातील फक्त एकच सदस्य घेऊ शकतो. एका कुटुंबात शेतकरी नवरा, बायको आणि त्यांचे अज्ञान बालक यांचा समावेश होतो. या कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच शेतकरी पिता आणि पुत्र दोघांना याचा लाभ मिळत नाही यापैकी एकालाच याचा लाभ मिळणार आहे.
शिवाय ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. यामुळे ज्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन आहे त्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावावर नाही त्याला कुठल्याही सबबीवर या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरवले जाणार नाही असे स्पष्ट नियम तयार करण्यात आले आहेत.
जर एका परिवारातील एका सदस्य पेक्षा अधिक सदस्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असतील तर असे अर्ज बाद केले जातील. जर समजा काही तांत्रिक त्रुट्यांमुळे एका परिवारातील दोन सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर दोन पैकी एका सदस्याचा लाभ रद्द केला जाईल आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली होणार आहे.
15वा हफ्ता केव्हा मिळणार?
पीएम किसानच्या अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून या योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हफ्ता खात्यात केव्हा जमा होणार? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेचा पुढला हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जमा होऊ शकतो.
पण याबाबत केंद्र शासनाने कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येत असल्याने नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.