Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अजूनही 11वा आणि 12वा हप्ता मिळालेला नाही.
या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत घोषित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी पडताळणी करून घ्यावी, अन्यथा 13 वा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
पीएम किसान योजनेच्या एका नोडलं अधिकाऱ्याने सांगितले की, पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पडताळणीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. जे शेतकरी बांधव ई-केवायसी प्रक्रिया करणार नाहीत अशांना 13व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळणे कठीण होऊ शकते. हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
हेल्पलाइन नंबरवर तक्रार करता येणार
ई-केवायसी करूनही शेतकऱ्यांना 2,000 रुपये न मिळाल्यास, ते पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबर-155261 वर कॉल करून स्थिती जाणून घेऊ शकतात. हा हेल्पलाइन क्रमांक खास पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे.
अशा पद्धतीने योजनेतील स्थिती तपासा
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरात जमिनीच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात शेतकरीही व्यस्त आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांची यादीही अपडेट केली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांची स्थिती तपासत राहिल्यास चांगले होईल. या कामासाठी खाली दिलेल्या प्रोसेसचे अनुसरण करा.
- प्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- होम पेजच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरच्या विभागात जा.
- येथे लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन वेब पेज उघडताच शेतकऱ्याने आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा.
- यानंतर कॅप्चा कोड टाका आणि जनरेट ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता नवीन पेज लोड होताच पीएम किसान स्टेटस तपासता येईल.