Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी दिले जात नाहीत. एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.
या योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आगामी सतराव्या हप्त्या संदर्भात देखील मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील 17 वा हप्ता हा जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांना या पैशांचा मोठा उपयोग होईल. तथापि या योजनेचा लाभ सात गटातील शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. आज आपण या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणाला मिळणार नाही पीएम किसानचा लाभ?
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आधीच या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे या योजनेसाठी वडील आणि मुलगा यापैकी फक्त एकच व्यक्ती पात्र राहणार आहे.
ज्यांची स्वतःची शेतीयोग्य जमीन नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे जे भाडेतत्त्वावर शेती करतात त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही.
तसेच ज्या अर्जदाराचे वय 01.02.2019 ला 18 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. म्हणजे योजनेची अंमलबजावणी सुरू होत असताना ज्या शेतकऱ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि ज्यांच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्यांचे कुटुंबातील सदस्य केंद्र/राज्य सरकारचे विभाग आणि प्रादेशिक कार्यालये/सार्वजनिक उपक्रम/वर्तमान/माजी अधिकारी आणि कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता) कोणत्याही सरकारी संलग्न/स्वायत्त संस्थेचे कार्यरत/निवृत्त अधिकारी/कर्मचारी आहेत अशांना याचा लाभ मिळणार नाही.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संवैधानिक पदे भूषवत आहेत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र/राज्याचे माजी/वर्तमान मंत्री राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्याने गेल्या वर्षभरात आयकर भरला असेल अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर/इंजिनियर/वकील/चार्टर्ड अकाउंटंट/वास्तुविशारद यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थेमध्ये नोंदणीकृत आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत अशांना देखील याचा लाभ मिळणार नाही.