Pm Kisan Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2019 साली पीएम किसान सन्माननिधी योजना नामक एक शेतकरी हिताची योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत दिली जाते.
हे वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन हप्त्यात शेतकऱ्यांना मिळत असतात. म्हणजेच शेतकऱ्यांना दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने मदत देण्याचे या योजनेचे स्वरूप आहे. ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
दरम्यान आता या योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी बांधव या योजनेच्या तेराव्या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. काही मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा तेरावा हप्ता हा मकर संक्रांत पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो. म्हणजे 15 जानेवारीच्या आधीच शेतकऱ्यांना या योजनेचा तेरावा हप्ता मिळणार आहे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की, शासनाने याबाबत कोणतीच औपचारिक अशी घोषणा किंवा माहिती दिलेली नाही यामुळे हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळेल याबाबत स्पष्टता आलेली नाही. परंतु गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला असल्याने जानेवारीत तेरावा हप्ता मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बहुतांशी शेतकरी बांधव या योजनेबाबत अनेक प्रश्न विचारत असतात. प्रामुख्याने एकाच वेळी पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात का असा प्रश्न अधिक विचारला जात आहे. जर तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्याला या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येतो.
मग ही शेतजमीन पतीच्या नावे असो किंवा पत्नीच्या दोघांपैकी एकालाच या केंद्रीय पुरस्कृत योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजे एकाच वेळी पती आणि पत्नी एकाच जमीनीच्या तुकड्यावर मालकी हक्क सांगत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यामुळे पती आणि पत्नी दोघांना एकाच वेळी या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या.
या लोकांना पण नाही मिळणार लाभ
तसेच आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कर भरत असेल तर त्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
याशिवाय स्वतःच्या नावावर शेत जमीन नसलेल्या लोकांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की शेतजमीन असेल मात्र इतर कोणाच्या नावावर म्हणजे पत्नीच्या, पतीच्या, वडिलांच्या, आईच्या इतर कोणाच्या नावावर असेल तरीदेखील या योजनेचा लाभ अशांना मिळणार नाही. म्हणजे ज्याच्या नावावर शेत जमीन त्यालाच या योजनेचा लाभ.
तसेच एखाद्याच्या नावावर शेत जमीन आहे मात्र तो जर सरकारी नोकरीवर असेल तर त्याला या योजनेतून वगळण्यात येईल.
डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या पेशावर असणाऱ्या लोकांना देखील या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
एखाद्या शेतकऱ्याला जर दहा हजार रुपये वार्षिक पेन्शन येत असेल तर त्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.