Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्याबाबत मोठी घोषणा करणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.
सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे एकाच वेळी न देता दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
त्या आधीच मात्र या योजनेतून दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये आणखी सहा हजाराची वाढ होणार म्हणजेच या योजनेतुन 12 हजार रुपये दिले जाणार अशी मोठी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान आता याच संदर्भात शासनाकडून मोठी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात यासंदर्भात माहिती दिली आहे. विरोधकांनी पी एम किसान योजनेतून दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार का याबाबत सरकारला प्रश्न केला होता.
यावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी उत्तर दिले आहे. कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले की, सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही.
या वर्षी 30 जानेवारीपर्यंत, विविध हप्त्यांमधून 2.24 लाख कोटी रुपयांची रक्कम कृषी आणि संबंधित क्रियाकलाप तसेच घरगुती गरजा भागवण्यासाठी उत्पन्न समर्थन म्हणून वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी यावेळी दिली आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा निरर्थक आणि खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे. पीएम किसान चे पैसे वाढवण्याबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.