Pm Kisan Yojana News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबवली जात आहे. या योजनेचे देशभरातील जवळपास साडेआठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो.
दोन हजार रुपयाचा दर चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे या योजनेचे स्वरूप आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. अर्थातच जो शेतकरी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ उचलत असेल त्या शेतकऱ्याला आतापर्यंत या योजनेअंतर्गत 28 हजार रुपयाचा लाभ सरकारकडून मिळाला असेल.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेचा शेवटचा म्हणजेच 14 वा हप्ता हा गेल्या महिन्यात अर्थातच जुलै महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. जुलै महिन्यातील 27 तारखेला या योजनेचा 14 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा हातभार लागला आहे.
खरंतर, या योजनेला सुरू होऊन जवळपास चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र तरी देखील या योजनेबाबत शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न आहेत. यात पीएम किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती व्यक्ती उचलू शकतात ? हा देखील प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कायमच विचारला जातो. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
कुटुंबातील किती सदस्यांना मिळणार पीएम किसानचा लाभ ?
पीएम किसान योजनेसाठी शासनाने काही नियम, अटी आणि शर्ती तयार केल्या आहेत. या अटींचे आणि शर्तींची जो शेतकरी पूर्तता करतो त्यालाच या योजनेअंतर्गत पात्र केले जाते. दरम्यान या योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो. एका कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलगा/मुलगी यांचा समावेश असतो.
अर्थातच जर या योजनेचा पती लाभ घेत असेल तर पत्नीला लाभ मिळणार नाही आणि जर पत्नी लाभ घेत असेल तर पतीला लाभ मिळणार नाही. जर समजा एखाद्या प्रकरणात पती-पत्नी दोघेही लाभार्थी असतील तर यापैकी एका जणांकडून या योजनेचा पैसा वसूल केला जाईल आणि दोघांपैकी एका जणाला या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. याचाच अर्थ पीएम किसानचा लाभ हा कुटुंबातील केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीला मिळतो.