Pm Kisan Yojana News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. परंतु हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी म्हणजेच एकदाच दिले जात नाहीत. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांचा एक हप्ता अशा तीन समान हप्त्यात वितरित केले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत. सतरावा हप्ता हा गेल्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. वाराणसी येथे 18 जूनला आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आगामी अठराव्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. अशातच, या योजनेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियामध्ये पीएम किसान योजनेच्या नावाखाली एक लिंक व्हायरल होत आहे. ही एका एप्लीकेशनची लिंक आहे.
या लिंक वर क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड होते. हे एप्लीकेशन डाउनलोड झाले की मोबाईल आणि सिम कार्ड हॅक केले जाते. म्हणजे मोबाईल आणि सिम कार्डचा कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातात जातो.
अशा तऱ्हेने मग संबंधित व्यक्तीची फसवणूक केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिंक वर क्लिक करू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. जर तुम्हाला सोशल मीडियावर अशी लिंक दिसली तर या लिंकवर क्लिक करू नका अन्यथा तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते.
वर सांगितल्याप्रमाणे सायबर फ्रॉड म्हणजेच फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी ताबडतोब 1930 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करायला हवा. याशिवाय शेतकरी बांधव सायबर क्राईमच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन याबाबतची रीतसर तक्रार दाखल करू शकता.
जर तुम्हाला पीएम किसान योजनेची कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळावर भेट दिली पाहिजे.
याशिवाय तुम्ही याचे अधिकृत सरकारी एप्लीकेशन देखील प्लेस्टोर वरून डाउनलोड करू शकता. कोणत्याही थर्ड पार्टी एप्लीकेशन वर विश्वास ठेवू नका. कोणत्याही लिंक वर क्लिक करण्याआधी ती लिंक बोगस तर नाही ना याची एकदा खातरजमा करा.