Pm Kisan Yojana Latest News : पीएम किसान सन्माननिधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या हस्ते झाली. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे.
या योजनेचे देशभरात सध्या स्थितीला जवळपास साडेआठ कोटी लाभार्थी शेतकरी आहेत. कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ पुरवला जात आहे. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचे पैसे वितरित होतात. पीएम किसानचे पैसे हे थेट शासनाच्या माध्यमातून डीबीटी अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत.
यामुळे या योजनेला मोठी पारदर्शकता लाभली आहे. परिणामी योजनेची लोकप्रियता संपूर्ण देशात वाढत चालली आहे. पण या योजनेसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा दावा केला जात आहे.
सरकार आगामी लोकसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच या योजनेचे पैसे वाढवणार असे बोलले जात आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी 6,000 रुपयाची रक्कम 12,000 पर्यंत वाढवली जाणार असा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जात आहे.
शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेणार असे देखील वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र आता या चर्चांबाबत दस्तूर खुद्द केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीच स्पष्टीकरण दिल आहे.
कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पीएम किसानच्या रकमेत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
“सध्या पीएम-किसानची रक्कम 6,000 रुपयांच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,” केंद्रीय मंत्री तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार या आशयाच्या सुरू असलेल्या चर्चाना आता पूर्णविराम मिळणार आहे.
पीएम किसानचा 16 वा आता केव्हा?
पी एम किसान चा पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचे वेध लागले आहे.
विशेष म्हणजे या योजनेचा पुढील हप्ता हा नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.