Pm Kisan Yojana Latest News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे. या योजनेचा पुढील हप्ता नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो.
मात्र हे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजे 3 समान हप्त्यांमध्ये हे 6000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जातो.
हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पाठवले जातात. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोदी सरकारने आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले आहेत. 18 वा हफ्ता हा नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
आता 19 वा हप्ता नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये जारी केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो, त्यामुळे पुढील हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचा देशातील 9.30 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, पी एम किसानच्या पुढील हप्त्यासंदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो यानुसार फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो असा एक अंदाज आहे.
तरीही अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर लक्ष ठेवावे. दुसरीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होणार असाही दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.
किती वाढणार रक्कम
सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आहेत. पण मोदी सरकार फेब्रुवारी 2025 मध्ये सादर केल्या जाणाऱ्या 2025-26 च्या पूर्ण अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही रक्कम वाढवण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रातील सरकार पीएम किसान अंतर्गत दिली जाणारी रक्कम 6000 रुपयांवरून 12000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. याचा फायदा 9 कोटी शेतकऱ्यांना होईल नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांची भेट घेतली होती.
या भेटीत पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली गेली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनांकडून आणि अर्थतज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. यामुळे याबाबत येत्या अर्थसंकल्पात सकारात्मक निर्णय होऊ शकतो अशा चर्चा आहेत.