Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या शेतकरी हिताच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन अशाचं सरकारी योजना आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे.
पी एम किसान अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण 12,000 रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. मात्र आता या योजनांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे.
सरकारने या योजनेसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नवीन नियमानुसार, वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
तसेच पीएम किसान नोंदणी करताना पती, पत्नी व मुलाचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो.
परंतु काही पती-पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर असणारे शेतकरी सुद्धा अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र आता अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आता पात्र लाभार्थीचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती किंवा पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी नसेल अथवा कर भरत नसेल, तर अशा शेतकऱ्यांना नोंदणी करून लाभ घेता येणार आहे.
कसे आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे स्वरूप
पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. मात्र हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
आतापर्यंत पीएम किसान अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते मिळाले आहेत. पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेचे स्वरूप हे बिलकुल पीएम किसान सारखेच आहे.
नमो शेतकरी अंतर्गत सुद्धा दरवर्षी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळतात. हे पैसे देखील दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.