Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश हा सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा असतो. अशीच एक योजना केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात असते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात असतो.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी परिषदेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.
18 जूनला हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. याचा लाभ आपल्या महाराष्ट्रातीलही लाखो शेतकऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांनी या योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून अठराव्या हप्त्याची यादी नुकतीच पीएम किसानच्या ऑफिशियल साइटवर प्रकाशित झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच, मात्र या योजने संदर्भात मराठवाडा विभागातून एक खळबळ जनक बातमी हाती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेच्या आडून मोठी फसवणूक झाली आहे. ही फसवणूक व्हाट्सअप वर झाली आहे.
यामुळे राज्यातील इतरही शेतकऱ्यांनी याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. हिंगोली मधील पाच शेतकऱ्यांना व्हाट्सअप वर पीएम किसान योजनेची लिंक पाठवून त्यांच्या खात्यातून एकूण सात लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गिरगाव येथील शेतकऱ्यांना पीएम किसान ची बनावट वेबसाईट व्हाट्सअप वर पाठवून त्यांचे अकाउंटमधील सात लाख रुपयांना चुना लावण्यात आला आहे.
बँक खात्यातून अचानक अन आपोआप पैसे कट झाल्याचे सदर शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयात धाव घेतली.
पोलीस मुख्यालयातील सायबर सेल कडे या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. या अनुषंगाने आता हिंगोली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे पैसे पळवणाऱ्या या सायबर भामट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.