Pm kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठे बदल होणार आहेत. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, या केंद्रीय पुरस्कृत योजनेत आता दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. मात्र हे सहा हजार रुपये एकरकमी न देता दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने एकूण तीन हप्त्यात ही रक्कम दिली जाते.
दरम्यान आता या योजनेत दोन हजार रुपयाची वाढ होणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना वार्षिक आठ हजार रुपये दिले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे. आता हे आठ हजार रुपये शेतकरी बांधवांना दोन हजाराच्या एकूण चार हप्त्यात मिळू शकतात असा अंदाज काही मीडिया रिपोर्ट मध्ये बांधला गेला आहे.
म्हणजेच आता या योजनेअंतर्गत एका वर्षात चार हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र असे असले तरी याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच औपचारिक अशी घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु 6000 ऐवजी पीएम किसान योजनेअंतर्गत आठ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र शासन करू शकते. यासाठी काही तज्ञ लोकांनी पाठपुरावा देखील केला आहे.
या लोकांनी केला पीएम किसान योजनेचा पैसा वाढवण्यासाठी पाठपुरावा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी त्यांच्या शोधनिबंधात पीएम किसानचा पैसा पुढील 5 वर्षात 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे
तसेच एम. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील स्वामिनाथन फाऊंडेशनने सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने मध्ये बदल करण्याचा आणि योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयांच्या लाभाला 15,000 रुपये प्रति वर्ष करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय नॅशनल फार्मर्स प्रोग्रेसिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या एमएसपी समितीचे सदस्य विनोद आनंद यांनीही पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 24,000 रुपये करण्याची सूचना मांडली आहे.
देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही पंतप्रधान किसान योजनेची प्रोत्साहन रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे.