Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचे संपूर्ण देशात करोडो लाभार्थी आहेत. जवळपास नऊ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते मिळाले आहेत.
सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देण्यात आला आहे.
तथापि, या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना पी एम किसान चा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा तसेच तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामुळे सदर शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी काय केले पाहिजे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे
कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील 88.82 लाख शेतकरी कुटुंबांना पी एम किसान चा 16 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे.
यासाठी केंद्र शासनाकडून 1983.72 कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र राज्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
मात्र ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी घाबरून न जाता या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता केली पाहिजे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक नाही, ई-केवायसी केलेली नाही, बँक खाते बंद आहे किंवा नोंदणीची प्रोसेस पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाहीये.
यामुळे, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नसेल त्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली पाहिजे. बँक खात्याला आधार लिंक नसेल तर हे काम देखील पूर्ण केले पाहिजे.
बँक खाते काही कारणास्तव बंद तर नाही ना याची देखील शेतकऱ्यांनी खात्री केली पाहिजे. जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील त्यांना लगेचच या योजनेचा हप्ता मिळू शकतो. पुढील हफ्त्यासोबत किंवा त्याआधी या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो.