Pm Kisan Mandhan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेती व्यवसायाला उभारी मिळावी, शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासले जावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजनेचा देखील समावेश होतो.
यापैकी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ केंद्र शासनाच्या माध्यमातून पुरवला जात आहे. हे 6000 रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सोळावा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी आशा जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे पीएम किसान मानधन योजना ही अशी एक योजना आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ हा फक्त आणि फक्त या योजनेत सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. म्हणजेच ही योजना ऐच्छिक आहे. या योजनेतून पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना काही रक्कम गुंतवावी लागते.
ठराविक रक्कम गुंतवल्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर 36 हजारापर्यंतची पेन्शन मिळते. म्हणजेच महिन्याला तीन हजार रुपयाची पेन्शन या योजनेअंतर्गत मिळत असते. अशा परिस्थितीत, आता आपण पीएम किसान मानधन योजनेसाठीच्या पात्रता आणि या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 55 रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंतची मासिक गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून असते. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचे वय 18 वर्षे असेल तर त्याला प्रत्येक महिन्याला 55 रुपये गुंतवावे लागतील तेव्हा 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा शेतकऱ्याला तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहेत. विशेष बाब अशी की या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला 50 टक्के एवढी पेन्शन मिळू शकते.
योजनेसाठीच्या पात्रता
या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त भारतीय शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच भारतात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जातो. म्हणजेच शेतकरी व्यतिरिक्त या योजनेचा लाभ इतर व्यक्तींना मिळणार नाही.
18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.
या योजनेचा लाभ दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जात आहे.
योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र
आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, वयाचा पुरावा, आधार क्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो अशा काही कागदपत्रांची योजनेच्या लाभासाठी आवश्यकता भासणार आहे.