Pik Vima Nuksan Bharpai : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम सुरू करत असते. या अभिनव उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू खरीप हंगामापासूनच सुरू झाली आहे. यानुसार राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवला आहे.
पण या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक पेरा बंधनकारक केला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये पिक पाहणी करण्यासाठी मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली आहे.
मात्र असे असले तरी राज्यात अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी ई पिक पाहणी पूर्ण केलेली नाही. खरंतर सुरुवातीला पिक पाहणी लावण्यासाठी राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत दिली होती. परंतु या मुदतीत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पिक पाहणी लावता आली नाही.
ग्रामीण भागात असलेला नेटवर्कचा प्रॉब्लेम, स्मार्टफोन हाताळताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, पिक पाहणी एप्लीकेशनचा सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम यासारख्या एक ना अनेक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिली होती.
परिणामी शेतकऱ्यांकडून पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून आता पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तरी शेतकऱ्यांनी या मुदतीत आपली पिक पाहणी लावून घ्यावी असे आवाहन यावेळी संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकरी बांधव गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले ई-पीक पाहणीचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून पीक पाहणी लावू शकता.