Pig Farming : अलीकडे शेती क्षेत्रात महिलांचा वाटा वाढत आहे. महिलांनी आता शेतीमध्ये देखील आपला जम बसवला आहे. अनेक प्रयोगशील महिला शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतीपूरक व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. दरम्यान, आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी वराह पालन व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे.
खरे तर शेतीसोबतच शेतकरी बांधव गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी पशूंचे संगोपन करतात. या पशूंच्या संगोपनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. मात्र फारच कमी शेतकरी असे आहेत जे की वराह पालन करत आहेत. यामुळे या व्यवसायातून अनेकांना चांगली कमाई होऊ लागली आहे.
हा व्यवसाय फारच कमी प्रमाणात केला जात असल्याने या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनाला बाजारात मोठी मागणी पाहायला मिळत आहे. यामुळे वराह पालन व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने देखील वराह पालन व्यवसायातून वार्षिक 40 लाख रुपयांपर्यंतची कमाई करण्याची किमया साधली आहे. ऋतुजा नारद चव्हाण असे या महिलेचे नाव आहे.
खरे तर ऋतुजा ताई यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. मात्र नोकरीमध्ये मन रमत नव्हते. त्यांना स्वतःचा काहीतरी हटके व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांचे वडील त्यांना नेहमीच वराह पालना बाबत माहिती देत असत.
दरम्यान यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली आणि वराह पालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम वराह पालन व्यवसाय नेमका कसा केला जातो, या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी काय केले पाहिजे यांसारख्या बाबी स्वतः जाणून घेतल्यात.
वराह पालनाचे प्रशिक्षण शिबिर त्यांनी अटेंड केले. यातून त्यांना वराह पालनाचे बारकावे समजलेत. ऋतुजा ताई यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी लार्ज व्हाईट यॉर्क शायर अन लँड्रेस या युरोपियन जातींच्या डुकराचे संगोपन सुरू केले.
हा व्यवसाय त्यांनी 30 मादी व तीन नर डुकरांपासून सुरू केला. ही डुकरे त्यांनी हरियाणातील एका व्यवसायिकाकडून विकत घेतली होती. यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्या शेतीमधील अर्धा बिघा जमिनीवर शेड तयार केले. ऋतुजा ताई सांगतात की, जी गोष्ट कोणीच करत नाही ती गोष्ट केल्यास यश मिळते.
दरम्यान यशाचे हेच गमक त्यांनी हेरले आणि वराह पालन हा व्यवसाय सुरू केला. आजच्या घडीला या व्यवसायातून त्यांना वार्षिक 30 ते 40 लाख रुपयांपर्यंतची कमाई होत आहे. वराह पालनाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे डुकरांच्या खाद्यावर खूपच कमी खर्च करावा लागतो.
त्यांना सहसा कोणताच रोग होत नाही यामुळे इतर पशुपालनाच्या तुलनेत वराहपालनामध्ये धोका फारच कमी असतो. तरी ऋतुजा ताई डुकरांचे लसीकरण करतात. यामुळे त्यांना या व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. वराह पालन व्यवसायाकडे हीन भावनेने पाहिले जाते. पण, या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते, हे या उदाहरणावरून सिद्ध होत आहे.