Petrol Pump Business : अलीकडे नोकरीऐवजी उद्योगधंद्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे. तरुण वर्गाचे आता नोकरीत मन रमत नाहीये. यामुळे अलीकडे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र अनेकांना कोणता व्यवसाय करावा याबाबत कल्पना नसते. व्यवसायासाठी भांडवल जमवण्याची ताकद त्यांच्यात असते मात्र नेमका कोणता व्यवसाय करावा जेणेकरून त्यांना चांगला फायदा होईल याबाबत त्यांना काही सुचत नाही.
म्हणून आज आपण पेट्रोल पंपाच्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. जर एखाद्याला मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पेट्रोल पंपाचा व्यवसाय अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. पेट्रोल पंपासाठी जरूर अधिकचा खर्च करावा लागतो मात्र यातून मिळणारी कमाई ही इतर व्यवसायापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. शिवाय पेट्रोलची मागणी ही बाजारात नेहमीच राहते यामुळे हा एक शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय सिद्ध होणार आहे.
दरम्यान आज आपण पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी व्यवसायिकांना किती भांडवल लागेल, पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कोणते परवाने लागतात, पेट्रोल पंप कोण सुरू करू शकतो, यासाठी किती जागेची आवश्यकता असते यांसारख्या एक ना अनेक छोट्या-मोठ्या बाबी अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पेट्रोल पंप व्यवसाय कोण सुरू करू शकतो?
मिळालेल्या माहितीनुसार, किमान 21 वर्षे आणि कमाल 60 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरु करू शकतात. याव्यतिरिक्त, ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा बारावी पास असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण जर अर्जदार एससी, एसटी किंवा ओबीसी प्रवर्गातील असेल तर असा अर्जदार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. मात्र शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असणे अनिवार्य आहे. म्हणजेच केवळ पदवीधर लोकच शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करू शकतात.
पेट्रोल पंपासाठी किती जागा लागते
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गलगत पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी 1200 ते 1600 चौरस मीटर पर्यंतची जागा लागते. यामुळे जर तुमच्याकडे महामार्गलगत स्वतःची एवढी जागा असेल तर आपण पेट्रोल पंप सुरू करू शकता किंवा भाडेतत्त्वावर जागा घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. भाड्याने जागा घेतल्यास मात्र याचा करारनामा संबंधित पेट्रोलियम कंपन्यांकडे सादर करावा लागणार आहे.
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किती भांडवल लागतं
कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम त्या व्यवसायासाठी किती भांडवल लागते याची चाचपणी केली जाते. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी देखील आधी या व्यवसायासाठी किती भांडवल लागणार आहे याची माहिती असणे जरुरीचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागानुसार वेगवेगळा खर्च लागतो.
शहरी भागात म्हणजे अर्बन एरिया मध्ये पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी 30 ते 35 लाख रुपये लागतात. मात्र ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी 15 ते वीस लाख रुपयांचा निधी पुरेसा असतो. विशेष म्हणजे यापैकी पाच टक्के रक्कम संबंधित कंपनीच्या माध्यमातून परतही केली जाते. याव्यतिरिक्त पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी म्हणजेच पेट्रोल पंपाची डीलरशीप घेण्यासाठी नोंदणी करावी लागते.
या नोंदणीसाठी देखील अर्जदार व्यक्तीला शुल्क द्यावे लागते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण व्यक्तीला डीलरशिप नोंदणी शुल्क आठ हजार रुपये लागते, मागासवर्गीयांसाठी चार हजार रुपये लागते आणि एससी तसेच एसटी प्रवर्गातील लोकांसाठी दोन हजार रुपये नोंदणी शुल्क लागते.
पेट्रोल पंप व्यवसायातून किती कमाई होणार?
हाती आलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपन्या पंप चालकाला प्रति लिटर दोन ते तीन रुपये कमिशन देतात. म्हणजेच एक लिटर पेट्रोल विकले तर दोन ते तीन रुपये मिळतात. याचाच अर्थ जर एखाद्या पंपचालकाने दररोज पाच हजार लिटर पेट्रोल विकले तर त्याला दहा हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे दर दिवशी कमिशन मिळणार आहे. याचाच अर्थ 5000 लिटर दररोज पेट्रोल विकल्यास पंप चालकाला दर महिन्याला तीन लाख ते साडेचार लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे.
परवाना कसा मिळवावा लागेल?
पेट्रोल पंप उघडण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून डीलरशिप घ्यावी लागते. देशात विविध पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंप चालवण्यासाठी परवाना दिला जातो. विविध सरकारी आणि खाजगी पेट्रोलियम कंपन्यां यासाठी परवाना देतात. या पेट्रोलियम कंपन्या विविध ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध करतात.
जर आपणास पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर आपण संबंधित ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याबाबतची माहिती प्राप्त करू शकता. तसेच इंडियन ऑइलच्या संबंधित रिटेल डिव्हिजनल ऑफिस/फील्ड ऑफिसरशी देखील पेट्रोल पंप सुरू करण्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधू शकता. तुम्हाला त्यांचे तपशील तुमच्या क्षेत्रातील इंडियन ऑइल रिटेल आउटलेट्स म्हणजे पेट्रोल पंपवर सहजतेने उपलब्ध होऊन जातील.