Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून देशात संमिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे. देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस तेथील शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढवत आहे.
मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेती पिकांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसत आहे. पिकांवर रोगराईचे संकट वाढले आहे.
बुरशीजन्य रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल अशी भीती आता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे तर काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी देखील होत आहे.
दरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कसे राहणार ? राज्यात अवकाळी पाऊस पडणार का ? याबाबत सविस्तर अशी अपडेट दिली आहे.
पंजाबरावांनी काल अर्थातच 19 डिसेंबर 2023 रोजी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात 19 ते 30 डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे या कालावधीत राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे.
राज्यात आता तीव्र थंडीची लाट येणार अशी शक्यता आहे. उत्तरेकडून आपल्या राज्यात जोरदार वारे वाहत आहेत म्हणून दिवसा सुद्धा थंडी वाचणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत म्हणजेच पुढील 10 दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहील असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तसेच या कालावधीमध्ये राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून अवकाळी पाऊस कुठेच पडणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
पण जानेवारीमध्ये एक मोठा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होईल असा अंदाज आहे.
एकंदरीत आगामी 10 दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल आणि थंडीचा जोर वाढेल असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात मात्र राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळणार आहे.