Panjabrao Dakh Weather Update : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आज 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाचा सण साजरा होणार आहे. खरंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
मानसून महाराष्ट्रातून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे यंदा परतीचा पाऊस देखील राज्यात अपेक्षित असा बरसलेला नाही. तसेच जून आणि ऑगस्ट महिन्यातही खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी भागात पाणी संकट तयार झाले आहे.
रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत त्या शेतकऱ्यांपुढे फळबाग वाचवण्याचे आव्हान आहे. यामुळे शेतकरी बांधवांची आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी इच्छा आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवरात्र उत्सवात पाऊस पडणार की नाही आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर केव्हा वाढू शकतो याबाबत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. खरंतर, अनेकदा नवरात्र उत्सवात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची हजेरी लागली आहे.
यामुळे यंदाही नवरात्र उत्सवात चांगला पाऊस बरसला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यामुळे बळीराजा देवाकडे साकडं घालत आहेत. दरम्यान पंजाबराव डख यांनी नवरात्र उत्सवात राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड आणि कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीमध्ये गोव्यातही पाऊस पडणार आहे. गोव्यातील पणजी व आजूबाजूच्या भागात या कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे.
मात्र या कालावधीत राज्यात आणि गोव्यात म्हणावा तसा मोठा पाऊस पडणार नाही. खूपच कमी प्रमाणात आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत राज्यात 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान हलका पाऊस पडू शकतो.
तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. मात्र असे असले तरी यावर्षी नोव्हेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
नवरात्र उत्सवाचा काळ संपल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होईल आणि नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात राज्यातील विविध भागात चांगला पाऊस बरसु शकतो असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे.