Panjabrao Dakh Soyabean Farming : नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने मान्सून 2024 चा आपला पहिला अंदाज सार्वजनिक केला आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात चांगल्या मान्सूनची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी ला निनासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने आणि इंडियन ओशियन डायपोल पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्याने मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसणार असा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर वाढणार असे आय एम डी ने म्हटले असून यावर्षी मान्सूनचे वेळेवर म्हणजेच महाराष्ट्रात आठ जूनच्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज आपण राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन हजर झालो झालो आहोत. खरे तर महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.
यंदा पाऊसमान चांगला राहणार असा अंदाज आयएमडीने दिला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढू देखील शकते. अशा परिस्थितीत आज आपण जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुचवलेल्या काही प्रमुख सोयाबीन जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरीप हंगामात सोयाबीनच्या कोणत्या जातीची लागवड केली पाहिजे
MAUS 612 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे हे एक सुधारित वाण आहे. पंजाबरावांनी या जातीची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. या जातीची पेरणी केल्यास सोयाबीनचे पीक 95 ते 98 दिवसात परिपक्व होते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे अतिवृष्टी झाल्यावर देखील पिकाची फारशी हानी होत नाही.
फुले कीमया : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे एक सुधारित वाण आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या या सुधारित जातीची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. या जातीचे पीक सरासरी 95 ते 100 दिवसात परिपक्व होते. यापासून हेक्टरी 25 ते 30 क्विंटल चा उतारा मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
फुले संगम : राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात या जातीची लागवड केली जाते. या जातीची पेरणी केल्यानंतर सरासरी 100 ते 105 दिवसात पीक परिपक्व होते. या जातीपासून सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.