Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून काळात महाराष्ट्रावर रुसलेला पाऊस आता मान्सून नंतर त्राहीमाम माजवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशा तांडव केला आहे. 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेला पाऊस राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशा सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात बरसला आहे.
काही भागात तर अक्षरशः गारपीट झाली आहे. यामुळे तेथील शेती पिकांची राख रांगोळी झाली आहे. प्रामुख्याने नासिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये गारपीट झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
अशातच भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 30 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील खांदेश विभागातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना आज पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. याशिवाय उर्वरित राज्यात काही भागात ढगाळ हवामान विजांसह अगदी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील अवकाळी पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात एक डिसेंबर पर्यंत मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे.
या विभागात अवकाळी पावसामुळे ओढ़े नाले भरून वाहतील असा अंदाज आहे. तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील एक डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात गारपिट होणार नाही फक्त पाऊसच पडेल यामुळे तेथील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे देखील डख यांनी सांगितले आहे. याशिवाय मराठवाड्यात दोन डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाड्यात पावसाची तीव्रता या कालावधीमध्ये कमी राहील अस त्यांनी नमूद केलं आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी
राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नांदेड, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये एक डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे.
तसेच या जिल्ह्यांमधील काही भागात 2 डिसेंबर पर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला यावेळी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.