Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे त्या भागातील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.
प्रामुख्याने भात पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. मात्र आता राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. शिवाय राज्यातील कमाल आणि किमान तापमान देखील किंचित कमी झाले असल्याने गारठा वाढू लागला आहे.
गुलाबी थंडीची खऱ्या अर्थाने आता कुठं चाहूल लागली आहे. वास्तविक नोव्हेंबरचा महिना सुरू झाला की थंडीला सुरुवात होत असते. यंदा मात्र हवामान बदलामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित अशी थंडी पडलेली नाही.
भारतीय हवामान विभागाने मात्र आता हळूहळू राज्यातील कमाल आणि किमान तापमान कमी होईल आणि थंडीचा जोर वाढणार असा अंदाज वर्तवला आहे. अनेक हवामान तज्ञांनी देखील आता राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचा जोर वाढू शकतो असे सांगितले आहे.
अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 27 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस पडणार का याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आज आपण पंजाबरावांचा हाच नवीन हवामान अंदाज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हटले पंजाब डख
पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विदर्भातील काही भाग, मराठवाड्यातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.
मात्र या कालावधीत पडणारा पाऊस सर्वदूर राहणार नाही. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस पडणार नाही.
एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडेल तर काही भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.
एकंदरीत राज्यात 24 तारखेनंतर हवामानात बदल होणार आहे. 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी आपल्या कामाचे नियोजन करणे गरजेचे राहणार आहे.