Panjabrao Dakh News : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. अर्थातच यंदा नेहमीपेक्षा उशिराने मान्सूनच आगमन झालं. खरंतर दरवर्षी सात जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. सुरुवातीला मान्सून तळ कोकणात येतो आणि त्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्र काबीज करतो.
यंदा मात्र मान्सून तळ कोकणात आल्यानंतर मान्सूनने तळ कोकणातच बरेच दिवस विश्रांती घेतली. जूनच्या अखेरपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. परिणामी महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनची सुरुवातच खराब झाली यामुळे यंदा पावसाळ्यात दुष्काळाचे मलभ गडद होणार अशी भीती व्यक्त होत होती.
पण शेतकऱ्यांची ही भीती जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीशी दूर झाली. जुलै महिन्यात राज्यात सर्व दूर पाऊस पडला. परंतु ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने मोठा खंड घेतला. ऑगस्टमध्ये जवळपास 21 ते 22 दिवस राज्यात पाऊस पडला नाही.
विशेष म्हणजे ज्या दिवशी ऑगस्ट मध्ये पाऊस पडला तो पाऊस देखील जोरदार नव्हता. यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाणार असेच बोलले जात होते. पण राज्यात सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात झाली. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला. मात्र पावसाचा लहरीपणा पुन्हा पुढे आला. 10 सप्टेंबर नंतर पुन्हा पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. अशातच 19 तारखेला अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या आगमना बरोबरच वरून राजाचे देखील आगमन झाले. राज्यात 19-20 सप्टेंबर च्या दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय झाला. पण पावसाचा जोर गौरी पूजनाच्या दिवसापासून वाढला.
22 सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान हवामान विभागाने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थातच गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एक ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुंबई, लातूर, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, अहमदनगर, नांदेड या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये राज्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये अर्थातच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान 2 ऑक्टोबर नंतर अर्थातच गांधी जयंती नंतर पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज आहे. राज्यात 5 ऑक्टोबर पासून हवामान कोरडे होणार असल्याचे पंजाबरावांनी नमूद केले आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. यंदा 19 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. दरम्यान याच कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता पंजाब रावांनी वर्तवली आहे.