Panjabrao Dakh News : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. वास्तविक राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडेच आहेत. पण हवामान विभागाने येत्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आता पावसाचा जोर वाढणार आहे. त्यांनी सांगितले की राज्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो.
यासोबतच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 सप्टेंबर पर्यंत रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. या कालावधीत राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
याचाच अर्थ ५ सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच पंजाबरावांनी या सप्टेंबर महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आणि शेती पिकांना जीवदान मिळणार असे सांगितले आहे. सप्टेंबर सोबतच ऑक्टोबर महिन्यातही यावर्षी चांगला पाऊस होणार असे भाकित त्यांनी यावेळी वर्तवले आहे.
यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. खरतर राज्यात ऑगस्ट महिन्यात खूपच कमी पाऊस झाला असल्याने राज्यातील प्रमुख धरणे अजूनही भरलेली नाहीत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा हंगाम तर वाया गेलाच आहे मात्र जर पाऊस पडला नाही तर रब्बी हंगाम देखील वाया जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दरम्यान पंजाबराव डख आणि भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे हा अंदाज खरा ठरावा आणि राज्यात जोरदार पाऊस व्हावा असे बोलले जात आहे.