Panjabrao Dakh News : हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी 48 तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे देशातील काही राज्यांमधून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. हवामान खात्याने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते. यानुसार आत्तापर्यंत राजस्था, दिल्ली आणि हरियाणा यांसारख्या राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली आहे.
तसेच देशातील इतरही राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पण राज्यात अजूनही मौसमी पाऊस सुरु आहे. 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास होणार आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी दिली आहे.
पंजाबरावांनी 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही असे सांगितले आहे. वास्तविक याआधी डख यांनी राज्यात नवरात्र उत्सवाच्या काळात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. यंदा नवरात्र उत्सवात चांगला पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
यामुळे ज्या भागात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. विजयादशमीच्या सणाला राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असे डख सांगत होते, म्हणून शेतकऱ्यांना खरीप वाया गेला असला तरी रब्बी हंगामात चांगल्या उत्पन्नाची आशा वाटतं होती.
मात्र चार ऑक्टोबर 2023 रोजी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आता 24 ऑक्टोबर पर्यंत कुठेच मुसळधार पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु राज्यातील हवामानात 24 ऑक्टोबर नंतर बदल होईल आणि 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
यावर्षी त्यांनी दिवाळीत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे जोरदार पाऊस पडतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान राज्यात सध्या सोयाबीन आणि मका हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी कापसाची वेचणी देखील सुरू आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार असल्याने कापूस, मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
मात्र ज्या भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही तेथील शेतकरी अजूनही पावसाची वाटच पाहत आहेत. एकंदरीत यंदा पावसाच्या असमान वितरणामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचे शिकार झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यात यंदा चिंतेचे वातावरण आहे.