Panjabrao Dakh News : सध्या संपूर्ण देशभर मान्सूनच्या चर्चा रंगल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने यंदा 31 मेला मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत आगमन होणार असे आधीच स्पष्ट केले आहे. तसेच, आपल्या राज्यात 10 जूनच्या सुमारास मान्सून आगमनाची शक्यता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. हवामान खात्याने मान्सूनची महाराष्ट्र आगमनाची तारीख जाहीर केलेली नाही मात्र हवामान खात्यातील तज्ञांनी जर अशीच पोषक परिस्थिती कायम राहिली तर मान्सून महाराष्ट्रात 10 जूनच्या सुमारास दाखल होईल असे म्हटले आहे.
अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सून बाबत गुड न्यूज दिली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मे ला मान्सून अंदमानात सक्रिय झाला आहे. अंदमानात सक्रिय झाल्यानंतर मान्सूनने चांगली प्रगती केली आहे.
मात्र मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असतानाच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आणि यामुळे मान्सून थोडासा कमजोर झाला आहे. परंतु या चक्रीवादळाचा मान्सूनवरील प्रभाव लवकरच निवळेल आणि 30 आणि 31 मेला पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी 30 मे पर्यंत आपली शेतीची पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन पंजाब रावांनी केले आहे. कारण की, महाराष्ट्रात एक जून ते पाच जून या कालावधीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यात मुसळधार स्वरूपाचा पूर्व मोसमी पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस होईल आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे.
पंजाब रावांच्या मते महाराष्ट्रात आठ ते नऊ जूनच्या सुमारास मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच राज्यात आठ जूनला मान्सून सक्रिय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी राहणार आहे.
एक ते पाच जून दरम्यान कुठं बरसणार पाऊस
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पूर्व मौसमी पावसाला सुरुवात होणार असून पाच जून पर्यंत पूर्व मौसमी पाऊस सुरू राहणार आहे. या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा या विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीत खूपच जोराचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी ओढे-नाले भरतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आठ आणि नऊ जून नंतर महाराष्ट्रात मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे.
एक ते पाच जून या कालावधीत राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच सहा जून ते नऊ जून दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब रावांनी यावर्षी मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होणारा असा अंदाज व्यक्त केला आहे.