Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी वाढ होत आहे. अनेक भागात ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिकांना अनुभवायला मिळत असून उन्हाच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण, परेशान झाले आहेत.
हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी पुढील दहा दिवस महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहणार असून ऑक्टोबर हिट चा अनुभव नागरिकांना येणार असल्याचे सांगितले आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरी 32 ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नमूद केले जात आहे. आता यामध्ये आणखी एक ते दोन अंश सेल्सिअस पर्यंतची वाढ होणार आहे. दहा दिवसांपर्यंत असेच हवामान कायम राहणार आहे.
यानंतर मात्र महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागणार आहे. दहा दिवसानंतर हळूहळू कमाल तापमानात घट होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असे अनुपम कश्यपी यांनी आपल्या हवामान अंदाजात सांगितले आहे. यासोबतच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील एक अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी कामाचा असा हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाच्या काळात काही भागात पाऊस पडू शकतो. 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, गोव्यातील पणजीमध्ये देखील पाऊस पडणार आहे. परंतु पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आहे म्हणजेच मोठा पाऊस पडणार नाही.
तर उर्वरित महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. 28 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा हवामानात बदल होईल आणि पुन्हा राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.