Panjabrao Dakh : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात त्राहीमाम वाजवला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.
पण या चालू महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र रिमझिम पावसामुळे देखील रब्बी पिकांचे आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
अशातच गेल्या दोन दिवसांपासून हवामानात थोडासा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ऊन, काही ठिकाणी ढगाळ हवामान तर कुठं थंडी पडत आहे.
दरम्यान, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी आज पासून अर्थातच 9 डिसेंबर 2023 पासून विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज वर्तवला आहे.
तसेच आता हळूहळू राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि यंदा मार्च 2024 पर्यंत थंडी पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.
यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिके पुन्हा एकदा नवीन उभारी घेतील आणि पिकांची चांगली वाढ होईल अशी आशा आहे.
राज्यात आता थंडीला सुरुवात होणार असल्याने स्वेटर, मफलर यांसारख्या उबदार कपड्यांना कपाटातून बाहेर काढावे लागणार आहे. कडाक्याची थंडी अजूनही पडलेली नाही मात्र येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे.
आजपासून हवामान कोरडे होणार असले आणि थंडीला सुरुवात होणार असली तरी देखील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा वातावरणात चेंज येणार आहेत.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा एक पाऊस पडेल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. एवढेच नाही तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील वरूणराजाची हजेरी लागणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. यामुळे आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.