Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. 10 फेब्रुवारीपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून यामुळे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठराविक ठिकाणी मध्यंतरी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे आणि काढणीसाठी आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत गारपिटीने बर्बाद झाले आहे. अगदी हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हीरावून घेतला असल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र केव्हा थांबणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज 16 फेब्रुवारी 2024 ला राज्यातील चांदूरबाजार, अमरावती, अकोट, बुलढाणा, वाशिम, कारंजा, लाड येथे अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र उद्यापर्यंत फक्त ढगाळ हवामान राहणार आहे कुठेच अवकाळी पाऊस पडणार नाही. 29 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.
29 फेब्रुवारी पर्यंत राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही. म्हणजेच फक्त आज पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
यानंतर मात्र हवामान कोरडे राहणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत आपली शेती कामे उरकून घ्यावीत असा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.
कारण की 29 फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यामुळे पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.