Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. 25 नोव्हेंबर पासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गारपीट देखील झाली होती. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची तीव्रता कमी झाली आहे.
मात्र अवकाळी पावसाचे आणि ढगाळ हवामानाचे सावट पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. अजूनही काही भागात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे अजूनही ढगाळ हवामान कायम असल्याने शेती पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. अशातच, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आगामी काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता 5 डिसेंबरपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या कालावधीत राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तथापि, पाच डिसेंबर नंतर पुन्हा एकदा हवामानात बदल होईल आणि राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज त्यांनी दिला आहे.
डख यांनी 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान आणि रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
6 डिसेंबर, 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी राज्यातील लातूर, नांदेड, उदगीर, धर्माबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती यासह विविध भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान आणि रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पण या कालावधीत खूपच हलका, अगदी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे आवाहन मात्र पंजाबराव यांनी केले आहे.