Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला आहे. सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे काहीसे चित्र सध्या नजरेस पडत आहे. मात्र वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
अनेक भागातील शेती पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले असून यामुळे बळीराजा पुन्हा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे काही भागात उष्णतेची लाट येणार असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे.
याशिवाय दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात वादळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
दरम्यान आज राज्यातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागासोबतच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचा अंदाज सार्वजनिक केला आहे. डख यांनी महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहणार असे म्हटले आहे.
काय म्हणतात पंजाबराव
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 26 एप्रिल पर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
राज्यातील परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत 26 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.
दुसरीकडे परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये 28 तारखेपर्यंत पाऊस हजेरी लावू शकतो असे त्यांनी आपल्या नवीन अंदाजात म्हटले आहे. मात्र 28 तारखेनंतर अवकाळी पावसाचे सावट दूर होणार आहे. तदनंतर महाराष्ट्रात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 45 अंशापर्यंत जाणार असा अंदाज यावेळी पंजाबराव यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. एकंदरीत आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.