Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. खरंतर, दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस सुरू होता.
अवकाळी पावसामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीसाठी तयार झालेले भात पीक अक्षरशः वाया गेले आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने भात, सोयाबीन, कापूस समवेतच सर्व खरीप पिकांच्या उत्पादन घटले आहे. दरम्यान, आता विविध संकटांचा सामना करून जोपासलेले पीक ऐन हार्वेस्टिंगच्या वेळीच अवकाळी पावसामुळे खराब झाले आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांमागील साडेसाती अजूनही संपलेली नाहीये. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असा अंदाज वर्तवला आहे. शिवाय हवामान खात्याने राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घट होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असे सांगितले आहे.
म्हणजेच आता महाराष्ट्रात गुलाबी थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी आगामी दहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणताय पंजाबराव
खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाब रावांनी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती. सात नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान पंजाब रावांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज बांधला होता. विशेष म्हणजे पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला.
या कालावधीत महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता पंजाबरावांचा पुढील हवामान अंदाज काय आहे असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान पंजाब रावांनी महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पर्यंत कसे हवामान राहू शकते याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता 25 तारखेपर्यंत अर्थातच पुढील दहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
25 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात आता कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही असे पंजाबरावांनी छातीठोकपणे सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे आता राज्यात हळूहळू थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
राज्यात आता आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार नाही. यामुळे शेतकरी बांधवांनी गहू आणि हरभरा पिकासाठी गरजेनुसार पाणी दिले पाहिजे असा सल्लाही डख यांनी यावेळी दिला आहे.