Panjabrao Dakh Havaman Andaj : संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागात काल पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. आज देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पावसाच्या सऱ्या पाहायला मिळाल्यात.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वनव्यामध्ये सापडलेला महाराष्ट्र या पावसाच्या मनमोहक सऱ्यामुळे खुलून उठला आहे. शेतकऱ्यांचे चेहरे देखील फुलले आहेत. खरंतर गेल्या महिन्यातील 31 दिवसांमध्ये फक्त चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस पडला. म्हणजेच गेल्या महिन्यात जवळपास 25 ते 26 दिवस पावसाचा खंड होता.
यामुळे खरीप हंगामातील पिके कोमेजली आहेत. काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे. शिवाय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यामुळे खरीप हंगामातील पिकांना आता नवीन जीवदान मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील एक महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाब रावांनी बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ तयार होत असून या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता जोरदार पाऊस सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात 3 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून पावसाचा जोर वाढणार असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबरपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल. 4 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत राज्यात चांगला जोरदार पाऊस पडेल.
या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या कालावधीमध्ये राज्यात सगळीकडे रोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असे त्यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे राज्यात 4 सप्टेंबर पासून ते 25 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सप्टेंबर प्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातही चांगला पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला मोठा पाऊस पडेल यावर्षी कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले आहे. यामुळे पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरावा आणि खरीपातील पिकांना पुन्हा नवीन जीवदान मिळावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.