Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाजात पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सध्या स्थितीला आपल्या राज्यात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत, अवकाळी पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आधीच या चालू मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमधील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आधीच या संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान वाढले आहे. यामुळे आता उन्हाळ्याची चाहूल भासत आहे.
दिवसा कडक ऊन आणि सकाळी वातावरणात गारवा अनुभवायला मिळत आहे. आगामी काळात मात्र उन्हाची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.
एलनिनोमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहू शकतो असे मत काही हवामान अभ्यासकांनी वर्तवले आहे. अशातच, आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
केव्हा सुरू होणार अवकाळी पाऊस ?
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यात 18 मार्चपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र 18 किंवा 19 मार्चनंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण, हा अवकाळी पाऊस राज्यात सर्वदूर बसणार नसून काही मोजक्याच जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, कारंजा, अमरावती, अकोट, चांदूरबाजार, बुलढाणा या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच राज्यातील मराठवाडा विभागात ढगाळ हवामानाचा अंदाज त्यांनी दिला आहे. याशिवाय राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात अंशता ढगाळ हवामान राहील असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
एकंदरीत राज्यातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्येच फक्त अवकाळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे, यामुळे राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांना फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.