Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : येत्या 5 दिवसात दिवाळीचा आनंददायी पर्व सुरु होणार आहे. 10 नोव्हेंबर पासून यावर्षी दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दहा नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. खरंतर दिवाळी सणाची सुरुवात गोवत्स द्वादशीपासून अर्थातच वसुबारसाच्या दिवसापासून होते.
म्हणजेच दिवाळी सणाला यावर्षी 9 नोव्हेंबर पासूनच सुरुवात होणार आहे. खरंतर, दिवाळी सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पण यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी संकटात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे. सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद झाली आहे.
परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वस्तुस्थिती मात्र याहीपेक्षा भीषण आहे. निकषामुळे काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही पण राज्यात या चाळीस तालुक्यांपेक्षा अधिकच्या भागात दुष्काळाची झळ पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी आगामी काही दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकंती करावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी यावर्षी हिवाळ्यातच टँकर सुरू होतील असा अंदाज आहे. जनावऱ्यांचा चाऱ्याचा देखील प्रश्न उद्भवणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या काळात पाऊस पडणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खरतर दरवर्षी दिवाळीच्या काळात थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागत असते. यामुळे यंदाही दिवाळीच्या काळात अवकाळी पाऊस बरसला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाची गरज भासू लागली आहे.
अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात दिवाळीपूर्वीच अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पंजाबरावांनी 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, विटा, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, दौंड, बारामती, पुणे, नाशिक, जुन्नर, ओतुर, उदगीर, देगलूर, निजामाबाद, मुंबई, अहमदनगर, ओझर, केज, धारूर, आंबेजोगाई, नांदेड, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, सेलू, माजलगाव, वैजापूर, गंगापूर, जालना, चिखली, पुसद, सिल्लोड, कन्नड, वाशिम, नाशिक, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वणी, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
या भागात पावसाचा जोर अधिक
पंजाबरावांनी सांगितले की, वर सांगितलेल्या भागांमध्ये 30 किलोमीटरच्या परिघात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस राहणार आहे. पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात या कालावधीत कमी पाऊस पडणार आहे. तसेच त्यांनी अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दिवाळी नंतर पाऊस पडणार का ?
अनेक शेतकऱ्यांकडून दीपावलीच्या काळात पाऊस पडणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान डख यांनी दीपावली पूर्वी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि दिवाळीनंतरही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मात्र दिवाळीनंतर केव्हा पाऊस पडणार याबाबत पंजाबरावांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. पण दिवाळीनंतर एक मोठा पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे आणि साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडू शकतो असे त्यांनी नमूद केले आहे.