Panjabrao Dakh : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सर्व दूर चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात गेल्या महिन्यात जोरदार पावसाची हजेरी लागली.
यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला. खरंतर गेल्या महिन्यातही सुरुवातीच्या काळात पावसाने महाराष्ट्राकडे पाठच फिरवली होती. मात्र गेल्या सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्व दूर चांगला पाऊस झाला.
यानंतर गणेशोत्सवाच्या काळातही महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी लागली. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान गेल्या महिन्यात गणेशोत्सव साजरा झाला आणि अगदी गणरायाच्या आगमनापासून ते गणपती बाप्पाचा निरोपापर्यंत राज्यात पाऊस मनसोक्त बरसला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले.
शिवाय राज्यातील प्रमुख धरणांच्या पाण्याच्या साठ्यातही मोठी वाढ झाली. आता मात्र मान्सून अंतिम टप्प्यात आला आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान यांसारख्या राज्यांमधून मान्सून परतला सुद्धा आहे. तर देशातील इतर राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
आपल्या राज्यातूनही येत्या काही दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून 4 ऑक्टोबरनंतर मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या काळात राज्यातुन मान्सून माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होत आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता 4 ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे. तसेच या कालावधीत कडक सूर्यदर्शन होणार असा अंदाज आहे. मात्र राज्यात पुन्हा एकदा पाच तारखे नंतर पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान नागपर, वर्धा, अमरावती, वासिम, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, उदगीर, लातूर या भागात थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र राज्यात आठ ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा हवामान कोरडं होईल आणि राज्यात परत 14 ऑक्टोबरच्या सुमारास पावसासाठी पोषक हवामान तयार होईल असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान अर्थातच नवरात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.