Panjabarao Dakh New Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने राज्यात पावसाचा जोर वाढला. 19 सप्टेंबर पासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या राज्यातील विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आज पासून ते एक ऑक्टोबर दरम्यान महाबळेश्वर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी , रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, गंगापूर, प्रवरा, अहमदनगर, श्रीगोंदा, नांदेड, सांगली, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नाशिक, यवतमाळ या भागात जोरदार पाऊस होणार आहे.
यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन आपल्या कामाचे नियोजन करणे जरुरीचे राहणार आहे. तसेच पंजाबरावांनी 2 ऑक्टोबर नंतर राज्यात पाऊस विश्रांती घेणार असे सांगितले आहे. गांधी जयंती नंतर राज्यात कडक सूर्यदर्शन होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
खरंतर पुढल्या महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात सोयाबीन हार्वेस्टिंगला सुरुवात होणार आहे. म्हणून सोयाबीन हार्वेस्टिंगच्या वेळी पाऊस उघडीप घेऊ शकतो असे चित्र तयार होत आहे. निश्चितच सोयाबीन उत्पादकांसाठी ही बातमी दिलासा देणारी राहणार आहे. मात्र असे असले तरी 5 ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे. पंजाबरावांनी पाच, सहा आणि सात ऑक्टोबर रोजी राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, उदगीर, लातूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीत मात्र थोड्याफार प्रमाणातच पाऊस पडणार आहे, म्हणजेच जोरदार पाऊस होणार नाही. तसेच यानंतर नवरात्रोत्सवात पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यंदा 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. आणि याच कालावधीमध्ये यावर्षी पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असा अंदाज पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.