Pakistan Decision On Onion News : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने देशातील किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी एक मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारने डिसेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. निर्यात बंदीमुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
शासनाच्या या निर्णयानंतर याचे पडसाद लगेचच बाजार समित्यांमध्ये उमटलेत. कांद्याचे बाजार भाव झपाट्याने खाली आलेत. या निर्णयाचा साहजिकच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.मात्र असे असले तरी केंद्र शासनाने 64,400 टन कांदा निर्यात करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने मित्र देशाच्या विनंतीला मान देत बांग्लादेशला ५० हजार मेट्रीक टन आणि यूएईला १४ हजार ४०० मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबतची अधिसूचना देखील केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच निर्गमित केली आहे.
एनसीईएल म्हणजे राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड या सहकारी संस्थेच्या माध्यमातून मित्र देशांना कांदा निर्यात होणार आहे. तथापि, भारत सरकारने लागू केलेली निर्यात बंदी ही 31 मार्चपर्यंत कायमच राहणार आहे.
दुसरीकडे पाकिस्तान मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजे तेथील सरकारने कांदा आणि केळीवर निर्यात बंदी लागू केली आहे. तेथील स्थानिक बाजारांमध्ये कांदा आणि केळीचे भाव वाढले असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान मधून आखाती देशांना मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात केली जाते. आता मात्र पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली आहे.
विविध रोगामुळे आणि कीटकांमुळे पाकिस्तान मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तिथे ऐन रमजानच्या महिन्यात कांद्याची आवक कमी होत आहे.
रमजानच्या महिन्यात नेहमीच कांद्याची मागणी वाढते. यंदा देखील तशीच परिस्थिती आहे मात्र तिथे आवक खूपच कमी असल्याने स्थानिक बाजारांमध्ये कांद्याच्या किमती विक्रमी भाव पातळीवर पोहोचले आहेत.
अशा परिस्थितीत या किमती कमी करण्यासाठी तेथील सरकारने आखाती देशांना कांदा निर्यात करण्यास बंदी घातली आहे. UAE मध्ये पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो.
आता मात्र पाकिस्तानने कांदा निर्यात बंदी केली असल्याने UAE मध्ये भारताच्या कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना होईल हे सांगणे थोडे कठीण आहे.