Onion Variety : कांदा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. याची लागवड भारतात मोठ्या प्रमाणात होते. भारतातील कांद्याच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत.
वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला खूपच कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नाहीये. देशातील इतर राज्यात मात्र कांदा चांगल्या भावात विकला जात आहे. तेलंगानात कांद्याला 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे.
महाराष्ट्रात मात्र कांद्याला खूपच कमी दर मिळत असून यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कांदा उत्पादकांना अधिक उत्पादन देणाऱ्या कांद्याच्या जातीची लागवड करावी लागणार आहे.
यामुळे आज आपण कांद्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्थित कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय म्हणजे DOGR या संस्थेने विकसित केलेल्या कांद्याच्या पाच सुधारित जातींची आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
भीमा श्वेता :- नावावरून लक्षात आलेच असेल की ही एक पांढऱ्या कांद्याची सुधारित जात आहे. खरंतर ही जात रब्बी हंगामासाठी शिफारशीत होती. मात्र आता खरीप हंगामामध्ये देखील या जातीची लागवड केली जाऊ शकते. खरिपासाठी या जातीची नुकतीच शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे पीक 110 ते 120 दिवसात परिपक्व बनते. या जातीपासून खरीप हंगामामध्ये 18 ते 20 टन प्रती हेक्टर आणि रब्बी हंगामामध्ये 25 ते 30 टन प्रती हेक्टरपर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते असा दावा केला जातो. विशेष बाब म्हणजे या जातीचा कांदा तीन महिन्यांपर्यंत साठवणूक केला जाऊ शकतो.
भीमा सुपर :- कांद्याची ही एक सुधारित जात असून राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये या जातीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे आपल्या महाराष्ट्र व्यतिरिक्त छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यातही या जातीचा कांदा उत्पादित होतो. या जातीची लागवड ही खरीप हंगामामध्ये तसेच लेट खरीप हंगामामध्ये केली जाते. म्हणजेच रांगडा कांदा म्हणूनही याची लागवड होते. लाल कांद्याची ही एक सुधारित जात असून या जातीपासून खरीप हंगामामध्ये 20 ते 22 टन प्रति हेक्टर आणि लेट खरीप हंगामामध्ये 40 ते 45 टन प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळते. खरीप हंगामात 100 ते 105 दिवसात आणि लेट खरीप हंगामात 110 ते 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते.
भीमा लाल :- भीमा लाल या नावावरून लक्षातच आले असेल की ही लाल कांद्याची जात आहे. म्हणजेच या जातीची लागवड खरीपात केली जाते. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामात देखील या जातीची लागवड होते. आधी फक्त रब्बी हंगामात याचे उत्पादन घेतले जात होते मात्र आता खरीप हंगामात देखील याचे उत्पादन घेता येत आहे. एवढेच नाही तर लेट खरीप हंगामात देखील या जातीची लागवड शक्य आहे. म्हणजेच खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात या जातीचा कांदा यशस्वीरित्या उत्पादित केला जाऊ शकतो. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात 100 ते 105 दिवसात आणि लेट खरीप तसेच रब्बी हंगामात 110 ते 120 दिवसात या जातीचे पीक परीपक्व बनते. उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या जातीपासून खरीप हंगामामध्ये 20 ते 22 टन प्रति हेक्टर, लेट खरीप हंगामामध्ये 48 ते 52 टन प्रति हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 30 ते 32 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
भीमा गडद लाल :- या जातीची लागवड खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी सर्वाधिक अनुकूल आहे. या जातीचे पीक साधारणता 95 ते 100 दिवसात परिपक्व बनते आणि यापासून 20 ते 22 टन प्रती हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीच्या कांद्याचा रंग हा गडद लाल असतो.
भीमा शुभ्र :- पांढऱ्या कांद्याची ही सुधारित जात आहे. यामुळेच या जातीला भीमा शुभ्र असं नाव देण्यात आलं आहे. राज्यातील ज्या भागात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते त्या ठिकाणी याची लागवड सर्वाधिक आहे. या जातीची विशेषता म्हणजे खरीप आणि लेट खरीप अशा दोनही हंगामात याची लागवड शक्य आहे. खरीप हंगामात 110 ते 115 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते आणि या हंगामामध्ये या जातीपासून 18 ते 20 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. लेट खरीप हंगामात या जातीचे पीक 120 ते 130 दिवसात परीपक्व बनते आणि या हंगामात 36 ते 42 टन प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन यापासून मिळते.