Onion Subsidy : कांदा हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामा मोठ्या प्रमाणात शेती होते. सध्या स्थितीला बाजारात खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक होत असून कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च देखील वसूल होणार नसल्याचे चित्र तयार झाले आहे. कांदा राज्यातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादित होतो.
जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. यामुळे सध्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. सध्या जिल्ह्यात कांदा 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून कांदा उत्पादकांना आर्थिक सहाय्य शासनाकडून पुरवणे अपेक्षित आहे.
दरम्यान आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये एवढ आर्थिक सहाय्य राज्य शासनाकडून दिल जावं अशी मागणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी केली आहे. यासंदर्भात डॉक्टर आहेर यांनी वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रतिक्विंटल पाचशे रुपये आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
डॉक्टर आहेर यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देखील दिले आहे. आहेर यांनी दिलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकार नेहमीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करत असते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरण आणते, नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करत असते, तसेच इतर शेतकरी हिताचे निर्णय घेत असते.
मात्र तरीदेखील सद्यस्थितीला बाजारात कांद्याला अतिशय नगण्य दर मिळत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य देणे जरुरीचे असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे आहेर यांच्या मागणीवर राज्य शासनाकडून आता खरंच सकारात्मक निर्णय घेतला जातो का? याकडे विशेष लक्ष राहणार आहे.