Onion Subsidy News : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र अनेकदा कांदा बेभरोशाचाच सिद्ध झाला आहे. कांद्याला कित्येकदा कवडीमोल दरात विकावा लागत असल्याने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होते. कांदा पिकासाठी केलेला खर्च देखील निघत नाही. 2018-2019 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती.
नोव्हेंबर 2018 पासून ते फेब्रुवारी 2019 पर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांदा अतिशय कवडीमोल दरात विकावा लागला होता. परिणामी त्यावेळी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारने विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान दिलं जाईल असं प्रावधान करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यावेळी राज्यातील बहुतेक कांदा उत्पादकांना अनुदान मिळालं होतं. मात्र सोलापूर व बार्शीचे कांदा उत्पादक शेतकरी बांधव या अनुदानापासून वंचित राहिले.
नंतर 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाले, भाजपा सरकार पडले आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारचा उदय झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. उद्धव ठाकरे सरकारने मात्र सोलापूर व बार्शी मधील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे लटकलेले अनुदान वितरित केले नाही.
शेवटी आता राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे राहिलेले अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. म्हणजे जवळपास चार ते पाच वर्षानंतर हा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.
आता सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकरी बांधवांना दोनशे रुपये प्रतिक्विंटल दराने अनुदान मिळणार आहे.यासाठी दहा कोटी बारा लाख रुपय मिळाले आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या 1172 शेतकऱ्यांचे प्रस्ताव कांदा अनुदानासाठी पात्र ठरले होते.
यासाठी दोन कोटी 64 लाख 60 हजार इतक्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. याशिवाय बार्शी येथील लक्ष्मी सोपान खाजगी बाजार समितीत ८०७४ शेतकरी बांधवांचे प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरले होते. यासाठी सात कोटी 47 लाखांची अनुदान मागितले होते. मात्र राजकीय उलथापालथमुळे हे अनुदान गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
मात्र आता राज्यात आलेल्या नवोदित शिंदे सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजूर केले आहे. म्हणजेच आता सोलापूर आणि बार्शी येथील बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दहा कोटी बारा लाखाच अनुदान मिळणार आहे.