Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अगदी पीक आहे. या पिकाची लागवड राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्, मराठवाडा , विदर्भ आणि कोकण अशा सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात कांद्याची यशस्वी शेती केली जात आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकातून चांगले उत्पादन सुद्धा मिळत आहे. पण, कांदा बाजारातील लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. काही प्रसंगी कांद्याला बाजारात विक्रमी भाव मिळतो तर काहींदा अशी परिस्थिती तयार होते की कांदा अगदी रद्दीच्या भावात विकला जातो.
यामुळे अनेकदा या पिकातून शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या 2023 वर्षात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
या नवीन वर्षात देखील अशीच काहीशी परिस्थिती असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कांद्याचे बाजार भाव डिसेंबर 2023 पासून दबावात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रातील मोदी सरकारचे धोरण. केंद्रातील मोदी सरकारने 8 डिसेंबर 2023 ला कांदा निर्यात बंदीचा मोठा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर लगेचच महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमधील कांद्याचे बाजार भाव कमी झालेत. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. डिसेंबर महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू राहणार आहे.
मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता आणि मित्र राष्ट्रांची विनंती पाहता नुकताच केंद्र सरकारने 64,400 टन कांदा बांगलादेश आणि युएई या देशांना निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतची नोटिफिकेशन अर्थातच अधिसूचना देखील सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल आणि कांद्याचे भाव वाढतील असे बोलले जात आहे. तथापि या देशांना सरकारी एजन्सीच्या माध्यमातून कांदा निर्यात होणार असल्याने भाव वाढीवर साशंकता व्यक्त होत आहे.
अशातच, आता कांदा उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवली जाणार आहे. सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली असून 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवायची की नाही याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
खरे तर किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. आता, मात्र किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या आहेत.
यामुळे 31 मार्चला सरकार कांदा निर्यात बंदी उठवणार अशा चर्चा आहेत. जर असे झाले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि कांद्याचे भाव वाढतील अशी आशा आहे.