Onion Rate Will Hike : सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातीबाबत एक तुघलकी निर्णय घेतला. केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा कांद्याच्या निर्यातबंदीला मुदतवाढ देण्याचा तुघलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डिसेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली.
कांदा निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात आली. मात्र आता ही निर्यात बंदी उठवण्याची डेट जवळ येत असतानाच सरकारने याला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊन टाकला.
यामुळे सरकार विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भावात घसरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो, लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
अशातच आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादकांसाठी सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. निर्यात बंदी वाढीची जखम दिल्यानंतर आता सरकारने त्यावर मलम लावण्याचे काम सुरू केले आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार येत्या दोन-तीन दिवसांत 5 लाख टन कांदा खरेदी सुरु करणार आहे.
सरकारने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. सरकार यावेळी रब्बी कांदा खरेदी करणार आहे. सरकार बफर स्टॉक साठी कांदा खरेदी करणार आहे. बाजारात जो भाव मिळतोय त्याच बाजारभावात सरकारकडून ही खरेदी होणार असा अंदाज आहे.
याचा परिणाम म्हणून बाजारात स्पर्धा तयार होईल आणि कांद्याचे बाजार भाव टिकून राहतील किंवा यामध्ये वाढ होईल अशी आशा आहे. तथापि शेतकऱ्यांना अशी शक्यता वाटत नाही. शेतकऱ्यांच्या मते जोपर्यंत निर्यात बंदी उठवली जात नाही तोपर्यंत बाजार भाव वाढू शकत नाहीत.
निर्यात बंदी केव्हा उठवणार ?
सध्या राज्यासहित देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा निर्यात बंदी केव्हा उठवली जाणार हाच सवाल उपस्थित केला जात आहे. खरे तर सरकारने कांदा निर्यात बंदीची मुदत वाढवली आहे.
मात्र ही कांदा निर्यात बंदी कधीपर्यंत सुरू राहणार याबाबत सरकारने कोणतीच माहिती दिलेली नाही. सरकारने फक्त पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी सुरू राहणार असे आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.