Onion Rate : सध्या राज्यातील बाजारांमध्ये कांद्याचे दर तेजीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी एक ते दोन रुपये प्रति किलो या दराने विकला जाणारा कांदा आता समाधानकारक बाजार भावात विकला जात आहे.
खरंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. यामागे सरकारचे धोरण देखील कारणीभूत होते. त्यावेळी कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हता यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही.
मात्र शेतकऱ्यांनी देखील सरकारला आपला हिसका दाखवला आणि लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारला मोठा फटका बसला. पण सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा सुरू असून राज्यात कांद्याचे दर विक्रमी भाव पातळीवर पोहोचले आहेत.
राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे कमाल दर 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसतोय. शेतकऱ्यांना वाढीव दराचा नक्कीच फायदा होत आहे मात्र यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे.
दुसरीकडे सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्याने सरकार निर्यात बंदी घालून कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीये. जर समजा सरकारने असा निर्णय घेतला तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यामुळे कांदा निर्यात बंदी जोपर्यंत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पूर्ण होत नाही तोपर्यंत घातली जाणार नाही असा ठाम विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत आहे. यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चांदी होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते ते या वाढीव बाजारभावातून भरून निघेल असा विश्वास आता व्यक्त होतोय. मिळालेल्या माहितीनुसार काल सहा नोव्हेंबर रोजी राज्यातील 42 बाजार समित्यांपैकी 41 बाजार समित्यांमध्ये कमाल भाव तीन हजार रुपये प्रति क्विंटल च्या वर नमूद करण्यात आलेत.
दुसरीकडे यातील सतरा बाजार समित्या अशा होत्या ज्यामध्ये कमाल दर ₹6,000 प्रतिक्विंटल च्या वर नमूद करण्यात आले. पुण्यातील शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याचा कमाल घाऊक भाव हा 7000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलाय.
येथील सरासरी भावही 4600 रुपये होता. त्यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. दरम्यान बाजार अभ्यासकांनी सध्या बाजारात कांद्याची कमी प्रमाणात आवक होत असल्याने दर अधिक तेजित आले असल्याचे म्हटले आहे.
खरे तर अजून बाजारात नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत नाहीये. पावसामुळे अनेक भागांमध्ये लाल कांद्याचे नुकसान झाले असून यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक फारशी पाहायला मिळत नाहीये. बाजार समित्यांमध्ये आवक कमी असल्याने बाजार भाव तेजीत आले आहेत.
तज्ञांनी जोपर्यंत नवीन कांद्याचे बाजारात आवक वाढत नाही तोपर्यंत दर असेच तेजीत राहू शकतात असे म्हटले आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू शकते आणि त्यानंतर हळूहळू बाजारभाव कमी होतील असे मत बाजार अभ्यासकांकडून वर्तवण्यात आले आहे.