Onion Rate : राज्यासह संपूर्ण देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जसं की आपणांस ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
5 पैकी तीन राज्यांत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यात बीजेपी ने सत्ता स्थापित केली आहे. काँग्रेसला फक्त तेलंगाना या एकमेव राज्यात सत्ता मिळवता आली आहे.
दरम्यान पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी झालेल्या या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते.
मात्र सेमी फायनल मध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवत फायनलकडे आगे कूच केली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सरकार सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.
सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
विदेशी व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे.निर्यात बंदीमुळे देशांतर्गत कांद्याचा साठा वाढणार आहे. बांगलादेश, युएई आणि मलेशिया या देशात कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असते.
मात्र आता निर्यात बंदी करण्यात आली आहे. यामुळे कांदा बाजारभावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढत चालली आहे. मात्र, निर्यात बंदीचा निर्णय झालेला असला तरी देखील काही देशांनी विनंती केल्यास त्यांना कांदा देता येणार आहे.
सध्या राजधानी दिल्लीत किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो 60 ते 70 रुपये या दराने विकला जात आहे. काही ठिकाणी 80 रुपये प्रति किलोपर्यंत याची विक्री होत आहे. देशातील अन्य भागांमध्ये सुद्धा कांदा पन्नास रुपये प्रति किलोपेक्षा जास्तीच्या दरात विकला जात आहे.
सरकारने कांदा दर पाडण्यासाठी घेतलेले निर्णय
केंद्र सरकारने सर्वप्रथम ऑगस्ट 2022 मध्ये कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या दरात सर्वसामान्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच 28 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांदा निर्यातीवर आठशे डॉलर प्रति टन एवढे निर्यात शुल्क लागू केले.