Onion Rate : कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही लागवड होते. मात्र कांद्याचे सर्वाधिक उत्पादन मध्य महाराष्ट्रात म्हणजेच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाते. याची लागवड उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते.
मात्र नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कांदा कधी ग्राहकांचा तर कधी शेतकऱ्यांचा वांदा करतो. याला बाजारात कधी खूपच विक्रमी दर मिळतो तर कधी अगदी कवडीमोल दरात कांद्याची विक्री करावी लागते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा अक्षरशः रद्दीपेक्षा कमी भावात विकावा लागला होता. त्यावेळी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या मध्यात केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू केली. परंतु या निर्णयाचा लगेचच फायदा झाला नाही.
कांदा निर्यात सुरू केली असली तरीदेखील निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू ठेवले. यामुळे कांद्याची निर्यात सुरू होऊनहीं फारशी निर्यात होत नाहीये.
परिणामी निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल दरात कांदा विकावा लागला. त्यानंतर मात्र कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झाली. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्याने बाजार भाव सुधारलेत. निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव तेजीत आले आहेत.
राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी 2,500 रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळतं आहे. तसेच कमाल बाजारभावाने 4000 चा टप्पा क्रॉस केला आहे. मात्र सर्वच बाजार समितीमध्ये असे विक्रमी दर मिळत नाहीयेत.
काही प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळतो. एकीकडे महाराष्ट्रात अशी परिस्थिती सुरू आहे तर दुसरीकडे केरळमधील बाजारात कांद्याला तब्बल सात हजाराचा भाव मिळतोय.
कुठे मिळाला विक्रमी दर
मीडिया रिपोर्ट नुसार दक्षिण भारतातील केरळ राज्यातील त्रिशूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल सात हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल भाव मिळाला आहे. तसेच केरळमधील कोलेंगोडे बाजार समितीतही कांदा दराने 4400 रुपये प्रति क्विंटलची पातळी गाठली आहे.
बाजार अभ्यासाकांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. तसेच कांद्याची आवकही कमी झाली आहे. यामुळे त्या ठिकाणी बाजार भावात सुधारणा झाली आहे. केरळ सारखीचं परिस्थिती भारताच्या इतरही दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे.